बंद

    लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था

    राज्यात दि.१ फेब्रुवारी, २०१४ पासून राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ ची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. सदर अधिनियमांतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी या योजनांसाठी पात्र लाभार्थ्याची निवड करण्याकरिता केंद्र शासनाकडून राज्याकरिता ७,००,१६,६८४ लाभार्थी इतका इष्टांक देण्यात आला आहे. अंत्योदय गटाच्या लाभार्थ्यांस प्रतिमाह प्रतिशिधापत्रिका 35 किलो अन्नधान्याचे वाटप करण्यात येते, तर प्राधान्य गटाच्या लाभार्थ्यास प्रतिमाह प्रतिव्यक्ती 5 किलो अन्नधान्याचे वाटप करण्यात येते.

    प्राधान्य कुटुंब गटाचे लाभार्थी निवडीचे निकष

    केंद्र शासनाने वितरित केलेल्या इष्टांकाच्या मर्यादेत लाभार्थ्यांची निवड करणे अपरिहार्य असल्यामुळे दि.१७.१२.२०१३ च्या शासन निर्णयान्वये राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेकरिता प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांची निवड करण्याकरिता ग्रामीण व शहरी भागाकरिता अनुक्रमे रु.४४,०००/- व रु.५९,०००/- इतकी वार्षिक उत्पन्न मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

    अंत्योदय अन्न योजना लाभार्थी कुटुंब निवडीचे निकष

    केंद्र शासनाने आतापर्यंत राज्यासाठी 25,05,300 इतका अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थी कुटुंबाचा इष्टांक मंजुर केला आहे. शासन निर्णय दिनांक 17.07.2013 व शासन शुध्दीपत्रक दि.14.11.2013 नुसार अंत्योदय अन्न योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी केंद्र शासनाने वेळोवेळी राज्य शासनास केलेल्या मार्गदर्शक सुचनांनूसार पात्र लाभार्थ्यांचे निकष निश्चित केलेले आहेत.

    अन्न सुरक्षा योजना इष्टांक

    शासन निर्णय दि. 04.09.2023 नुसार अंत्योदय व प्राधान्य योजनेच्या इष्टांकाचे सुधारित जिल्हानिहाय वाटप करण्यात आले आहे.