बंद

    राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम,२०१३

    नागरिकांना अन्न व पोषण सुरक्षा पुरविण्याकिरता रास्त दरात पुरेशा प्रमाणात दर्जेदार अन्नधान्य उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने देशात दि.05 जुलै, 2013 पासून राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 लागू करण्यात आला आहे. राज्यात दि.01 फेब्रुवारी, 2014 पासून सदर अधिनियमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर अधिनियमानुसार राज्यातील सुमारे 62.3 टक्के (ग्रामीण 76.32 टक्के व शहरी 45.34 टक्के) लोकसंख्या अनुदानित दराने अन्नधान्याचा लाभ मिळण्यास पात्र आहे. त्यानुषंगाने राज्यासाठी 700.17 लक्ष लाभार्थ्यांचा इष्टांक प्राप्त झाला असून त्याअंतर्गत 25,05,300 अंत्योदय अन्न योजना कुटुंब व 5.92 कोटी प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांचा समावेश आहे. दि.17.7.2013 च्या शासन निर्णयान्वये अंत्योदय अन्न योजनेसाठी निकष विहीत करण्यात आले आहेत. दि.17.12.2013 च्या शासन निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजनेत समाविष्ट न झालेल्या दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल-पिवळी शिधापत्रिका) कुटुंबांचा तसेच ग्रामीण भागातील ₹ 44,000/- व शहरी भागातील ₹ 59,000/- पर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या दारिद्र्यरेषेवरील (एपिएल-केशरी) शिधापत्रिकाधारकांचा प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांमध्ये समावेश होतो. सदर अधिनियमांतर्गत अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारकांना प्रतिमाह प्रतिशिधापत्रिका 35 किलो अन्नधान्य तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रतिमाह प्रतिव्यक्ती 5 किलो अन्नधान्य वितरीत करण्यात येते. सदर अन्नधान्य ₹3/- प्रतिकिलो तांदूळ, ₹2/- प्रतिकिलो गहू व ₹1/- प्रतिकिलो भरडधान्य या दराने वितरीत करण्याची तरतूद आहे. केंद्र शासनाच्या दि.30.12.2022 च्या अधिसूचेनुसार दि.01.01.2023 ते दि.31.12.2023 या कालावधीत सदर अन्नधान्य मोफत वितरीत करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या दि.04.12.2023 च्या अधिसूचेनुसार दि.01.01.2024 ते पुढील पाच वर्ष (दि.31.12.2028 पर्यंत) या कालावधीत सदर अन्नधान्य मोफत वितरीत करण्यात येणार आहे.

    राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत राज्याला दिलेला लाभार्थ्यांचा 700.17 लक्ष एवढा इष्टांक विचारात घेऊन केंद्र शासनाने त्यांच्या दि.28.02.2023 व दि.01.06.2023 च्या पत्रान्वये प्राप्त झालेल्या नियतनानुसार माहे एप्रिल, 2023 ते डिसेंबर, 2023 या कालावधीकरिता 3,83,766 मे. टन (2,45,610 मे.टन तांदूळ व 1,38,156 मे.टन गहू) अन्नधान्याचे जिल्हानिहाय नियतन उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

    अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी सदस्यांचा सुधारित इष्टांक देण्याच्या दॄष्टीने शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली (आरसीएमएस) वर संगणकीकरण करण्यात आलेल्या अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका व प्राधान्य कुटुंब लाभार्थी संख्येच्या आधारे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत दि.04.09.2023 च्या शासन निर्णयान्वये जिल्हानिहाय सुधारित इष्टांक देण्यात आलेला आहे.