बंद

    राज्य अन्न आयोग :-

    महाराष्ट्र राज्यामध्ये दिनांक 1 फेब्रुवारी, 2014 पासून राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 ची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 मधील कलम 16 ते 21 मध्ये राज्य अन्न आयोगाची रचना व कार्यपध्दती विषद केली आहे. सदर अधिनियमातील कलम 16 (1) अन्वये अधिनियमाच्या अंमलबजावणीवर संनियंत्रण व पुनर्विलोकनाच्या प्रयोजनार्थ “राज्य अन्न आयोग” गठीत करण्याची तरतूद आहे.

    राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 मधील कलम 16 (2) मधील तरतुदीनुसार राज्य अन्न आयोग या पदावरील अध्यक्ष, 5 सदस्य व 1 सदस्य सचिव या पदां पैकी 2 व्यक्ती या महिला सदस्य असतील अशी तरतूद करण्यात आली आहे. तसेच उपरोक्त 7 पदांपैकी 1 सदस्य अनुसुचित जातीचा आणि 1 सदस्य अनुसुचित जमातीचा असेल, अशी तरतूद करण्यात
    आली आहे.

    राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 मधील कलम 16 (3) मध्ये राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष व इतर सदस्य पुढील व्यक्तींमधून नियुक्त करता येतील अशी तरतूद करण्यात आली आहे:-

    (क) अन्नसुरक्षा, धोरण तयार करणे आणि कृषि, नागरी पुरवठा, पोषण आहार, आरोग्य किंवा इतर संलग्न क्षेत्र, यामधील प्रशासन या बाबीसंबंधात ज्ञान व अनुभव असणारी अखिल भारतीय सेवेची, केंद्र किंवा राज्याच्या इतर कोणत्याही नागरी सेवेची सदस्य आहे किंवा होती किंवा केंद्र वा राज्याच्या नागरी सेवेत एखादे नागरी पद धारण केलेली आहे;

    किंवा

    (ख) कृषि, कायदा, मानवी अधिकार, सामाजिक सेवा, व्यवस्थापन, पोषण आहार, आरोग्य, अन्नविषयक धोरण किंवा लोक प्रशासन यामधील विस्तृत ज्ञान व अनुभव असलेली सार्वजनिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती;

    किंवा
    (ग) गरीबांच्या अन्न व पोषण आहाराच्या हक्कांच्या सुधारणांच्या संबंधात ज्या व्यक्तीने आपले काम सिध्द केले आहे, अशी व्यक्ती;

    राज्य अन्न आयोग, मुंबई येथील अध्यक्ष आणि सदस्य यांच्या नियुक्ती करण्यासाठी महाराष्ट्र अन्नसुरक्षा अधिनियम (सुधारणा), 2023 मधील नियम 6 अन्वये खालीलप्रमाणे कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे:-

    1. राज्य अन्न आयोगाच्या अध्यक्षाच्या व सदस्यांच्या नियुक्तीकरीता वृत्तपत्रातील / अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या संकेतस्थळावरील सूचनेद्वारे अर्ज मागविण्यात येतील.
    2. छाननी समिती, राज्य अन्न आयोगाच्या अध्यक्षाच्या व सदस्यांच्या नियुक्तीसाठी उपलब्ध असलेल्या उमेदवारांची संक्षिप्त यादी तयार करील. उक्त छाननी समितीमध्ये पुढील सदस्यांचा समावेश असेल :-
      • सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग – अध्यक्ष;
      • अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अखत्यारितील नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा – सदस्य;
      • उपसचिव व किंवा सहसचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग – सदस्य.
    3. समितीने छाननी केलेल्या उमेदवारांची सूची अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्तीसाठी राज्य शासनाकडे विचारार्थ सादर करण्यात येईल.

           

    दि.23.05.2023 रोजीच्या शासन आदेशान्वये, श्री. तातोबा कोळेकर, सह सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांची राज्य अन्न आयोगाच्या सदस्य सचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.